मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत, ते ‘मिस्टर सत्यवादी’ असल्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळणारच: संजय राऊत


मुंबई: एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील त्याचबरोबर ‘मिस्टर सत्यवादी’ असल्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळणारच असे वक्तव्य केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, पूजा चव्हाण प्रकरणी सध्या तपास सुरु आहे. मुख्यमंत्री हे अत्यंत संवेदनशील मनाचे असून या प्रकरणाकडे ते काही डोळे झाकून बसलेले नाहीत. कोणावरही मुख्यमंत्री हे अन्याय होऊ देणार नाहीत. त्यांचे राज्यातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते. या प्रकरणाचा तपास होणार आणि पूजा चव्हाण आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळणार.

संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली असून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असते, असे वक्तव्य केले. संजय राऊत त्यावर बोलताना म्हणाले की, चित्रा वाघ या विरोधी पक्षात असल्यामुळे त्या आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणाची अतिरिक्त माहिती असेल तर त्यांनी ती राज्याचे गृहमंत्री आणि तपास यंत्रणाना द्यावी.

चित्रा वाघ यांना सल्ला देताना संजय राऊत हे म्हणाले की, या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर त्यांनी अशा पत्रकार परिषदा घ्याव्यात. या अशा प्रकरणांचा प्रसिद्धीसाठी कोणीही वापर करु नये. भाजपच्या वतीने संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन छेडले आहे. खासदार संजय राऊत त्यावर बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची आंदोलन करु नये अशी भूमिका आहे. महाराष्ट्राची परंपरा ही सत्यासाठी, न्यायासाठी लढणारी अशी असल्यामुळे हा प्रश्न चर्चेतून सोडवावा. या प्रकरणी विरोधी पक्षांनी विधानसभेत प्रश्न विचारावेत. त्याचबरोबर संजय राऊतांनी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या प्रश्वावर आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. राज्याच्या गृहमंत्र्यांकडे या प्रकरणी अधिक माहिती असेल असेही त्यांनी सांगितले.