पूजा चव्हाण प्रकरणी चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान!


मुंबई – सरकारला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून घेरण्याची पूर्ण तयारी भाजपने केली असून सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर आव्हान दिले आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. जर राज्य सरकारने सोमवारच्या आत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, त्यांची चौकशी सुरू केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी यावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवदन करावे, नाहीतर या मुद्द्यावर आम्ही तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षांच्या वतीने दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री सत्यवादी असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्याचा समाचार घेताना चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत हे मान्य आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे ते नातू आहेत. पण व्यवहारात ते दिसत नाही. त्यांना भूमिका घेताना स्वत:च्या खुर्चीची काळजी असल्यामुळे ते संजय राऊतांना सत्यवादी कुठे दिसले, ते माहीत नाही.