चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल


मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबीकडून चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेहिशोबी संपत्ती किशोर वाघ यांच्याकडे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, याबाबत मला आणि माझ्या पतीला कुठलीही माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझी बाजू मांडण्याची संधी देखील मला दिली गेली नाही. हा सुडबुद्धीने केलेला प्रकार आहे. मी कायदेशीर लढा देण्यासाठी तयार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. किशोर वाघ यांच्यावर परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरु होता. आता या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. एसीबीकडून सांगण्यात आले आहे की, तपास अनेक दिवसांपासून सुरु होता. त्यामुळे आता काही माहितीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे असलेल्या 90 टक्के मालमत्तेचा हिशोब नसल्याचे एसीबीचे म्हणणे आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर याबाबत म्हणाले की, हा पूर्णपणे सूडभावनेने केलेला प्रकार आहे. चित्रा वाघ पूजा चव्हाण प्रकरणी जमिनीवर उतरुन आक्रमक पद्धतीने न्याय मागत आहेत. त्या सरकारला धारेवर धरत आहेत. सरकारच्या विरोधात बोलले की, जुन्या केसेस वर काढल्या जात आहेत. डिसमिस झालेल्या केसेस सूडभावनेतून वर काढल्या जात असल्याचे दरेकर म्हणाले. एखाद्याच्या न्याय हक्कांसाठी लढले की अशी मुस्कटदाबी केली जात आहे. चित्रा वाघ लढणाऱ्या नेत्या आहेत, त्या आणखी ताकतीने लढतील, आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे ते म्हणाले.

पुणे पोलिसांकडून पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास काढून घ्यावा आणि हा तपास एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्याला सोपवावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे. पुणे पोलिसांनी आमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिलेले नाहीत. सगळे पुरावे असतानाही पोलीस आणि सरकार कुणाची वाट पाहते आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.