एक हजार अंकांनी शेअर बाजार गडगडला


मुंबई – शुक्रवारची भारतीय शेअर बाजाराची सुरूवातच प्रचंड पडझडीने झाली असून हा शुक्रवार ब्लॅक फ्रायडे ठरतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. सकाळी शेअर बाजाराचे व्यवहार सुरु झाल्या झाल्या एक हजारांहून अधिक अंकाची पडझड झाल्याचे चित्र पहायला मिळाले. या पडझडीला जागतिक बारपेठेमधील घसरण कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

शेअर बाजार सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी सुरु झाला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सेन्सेक्स ५० हजार १८४.६० वर होता. बाजार काल बंद झाला, तेव्हा सेन्सेक्स ५१ हजारांवर होता. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी हा निर्देशांकही २८३.४५ अंकांनी घसरला आणि १४.८३५.४५ वर स्थिरावला. कालच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये १.६८ टक्के तर निफ्टीमध्ये १.८७ टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स एक हजार अंकांनी घसरला होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयकडून आज भारताच्या जीडीपीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर २०२०-२१ मध्ये जीडीपीची किती वाढ झाली यासंदर्भातील आकडेवारी आज जाहीर होणार असल्याने त्यावरही बाजारामधील चढ उतार अवलंबून असेल.

अर्थव्यवस्थेच्या वाढीवर मागील दोन तिमाहींमध्ये अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला होता. पण अनलॉक झाल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जीडीपीची वाढ आधीच्या दोन तिमाहीपेक्षा चांगली असेल अशी अपेक्षा आहे. अर्थात शेअर बाजारावर जागतिक अर्थव्यवस्थेचे पडसादही दिसून येत असल्यामुळे पडझड झाल्याचे सांगितले जात आहे.

आशियामधील जवळजवळ सर्वच शेअर बाजारांमध्ये अमेरिकेतील वॉल स्ट्रीटमध्ये घसरण झाल्याने आज नकारात्मक सुरुवात झाल्याचे पहायला मिळाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव गडगडल्याचे चित्र दिसले. दोन टक्क्यांनी ऑस्ट्रेलियातही शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला. जानेवारी २८ नंतरची ऑस्ट्रेलियन शेअर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे. १.८ टक्क्यांनी जपानचा शेअर बाजार गडगडला तर १.६९ टक्क्यांची घसरण हाँगकाँगच्या शेअर बाजारामध्येही पहायला मिळाली. अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवरील नॅसडॅकमध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. नॅसडॅकमधील मागील चार महिन्यातील एका दिवसातली सर्वात मोठी घसरण गुरुवारी पहायला मिळाली.