अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओमध्ये पोलिसांना सापडले पत्र, नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है


मुंबई – गुरूवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील एंटेलिया या निवासस्थानाबाहेर आढळल्याने एकच खळबळ उडाली. जिलेटीन या स्फोटकांच्या सुट्टया कांड्या या गाडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय गाडीत एक पत्रही सापडल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर असलेल्या स्कॉर्पिओमधून नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है अशा आशयाचे पत्र सापडल्याची माहिती आहे. पण पोलिसांनी चिठ्ठीतील मजकुराबाबत सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही. तसेच, अंबानी यांच्या ताफ्यातील आणखी काही गाड्यांच्या नंबर प्लेट पोलिसांना सापडल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, ही स्कॉर्पिओ अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावरच उभी होती. गाडीत स्फोटके असल्याची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या व वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. पोलिसांनी या घटनेनंतर अंबानींच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ केली असून जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. कार मायकल रोडवर मोठया प्रमाणावर पोलिसांसह कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.


तर, जिलेटीन स्फोटकाच्या २० कांड्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या काही अंतरावर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस करीत असून चौकशीतून लवकरच सत्य समोर येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.