पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपची आक्रमक भूमिका; अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही


मुंबई – भाजपने राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन आक्रमक भूमिका घेतली असून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. भाजप मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी राठोड यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही अधिवेशन चालू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुण्यात बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण हिने केलेल्या कथित आत्महत्येप्रकरणात राठोड यांचे नाव घेतले जात असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना भातखळकर यांनी एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नाव समोर घेतले जाणाऱ्या मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करुन एफआयआर दाखल करण्याची गरज होती. पण राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कसली वाट पाहत आहेत?, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच राठोड प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर भातखळकर यांनी निशाणा साधताना, बलात्कारी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची पाठराखण करणारे हे सरकार असल्याचा टोलाही लगावला आहे. पुण्यामध्ये आत्महत्या केलेली तरुणी आणि मंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. तरी हे मंत्री उघड माथ्याने फिरत आहेत. राज्यात यावर काहीच होत नाही, हे खेदजनक असल्याचेही भातखळकर यांनी म्हटले आहे.