नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेणाऱ्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश


भोपाळ – महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेणाऱ्या नेत्याने चक्क काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशात हा पक्षप्रवेश पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार पडला. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ माजी नगरसेवक बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित होते.

बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशाचे फोटो मध्य प्रदेश काँग्रेसने ट्विटरवर शेअर केले आहेत. याआधी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत हिंदू महासभेकडून पालिका निवडणूक लढत बाबुलाल चौरसिया यांनी जिंकली होती. २०१९ मध्ये बाबुलाल चौरसिया चर्चेत आले होते, जेव्हा नथुराम गोडसेचे कोर्टातील शेवटचे वक्तव्य आपण एक लाख लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

काँग्रेसने मात्र राहुल गांधींचा उल्लेख करत बाबुलाल चौरसिया यांचा पक्षप्रवेश कसा योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते याआधी काँग्रेसमध्ये होते. ते हिंदू महासभेकडून निवडणूक लढत नगरसेवक म्हणून निवडून आले. आमचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केले आहे. गांधी कुटुंब किती मोठ्या मनाचे आहे. त्यांच्या याच आदर्श मूल्यांमुळे आज गोडसेची पूजा करणारा व्यक्ती गांधींची पूजा करत असल्याचे ग्वालियरमधील काँग्रेस आमदार प्रवीण पाठक यांनी म्हटले आहे.

गोडसेला श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी बाबुलाल चौरसिया यांनी आपल्याला भाग पाडण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच आपण याआधीही काँग्रेसमध्ये होतो, त्यामुळे आपण कुटुंबात पुन्हा परतल्याचे म्हटले आहे. यावरुन भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. ग्वालियर-चंबलमध्ये पालिका निवडणुकीत लोकांनी नाकारल्याने काँग्रेसचे प्रयत्न सुरु असल्याचे भाजप प्रवक्ते राहुल कोठारी यांनी म्हटले आहे. कमलनाथ यांनी शिवराज सिंग चौहान यांना तुम्ही महात्मा गांधींसोबत आहात की नथुराम गोडसेसोबत अशी विचारणा केली होती, आता कमलनाथ यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे, असेही म्हटले आहे.