मुख्यमंत्र्यानी यापुढे कधीही आपल्या भाषणात स्वतःला मी मर्द असल्याचे म्हणवून घेऊ नये


मुंबई – विरोधकांकडून ठाकरे सरकारची पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधक वारंवार संजय राठोड यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप करत असतानाच पोहरादेवी गर्दी जमवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. संजय राठोड यांनी बुधवारी मुंबईत येत मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावल्यामुळे आक्रमक भूमिका घेत विरोधकांनी पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजपा नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.


ट्विट करत निलेश राणे यांनी ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले आहेत की, ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवतय. सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतो, कॅबिनेट मीटिंगमध्ये बसतो पण तरीही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही. परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे.

दरम्यान दुसरीकडे गुरुवारी पुण्यात घटनास्थळी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी भेट दिली. ज्या इमारतीत पूजा चव्हाण राहत होती, तिने जिथे आत्महत्या केली त्या इमारतीची चित्रा वाघ यांनी पाहणी केली. यावेळी पूजा चव्हाण राहत होती ती रुम सील करण्यात आल्याचे सांगितल्यामुळे त्यांनी इमारतीमधील दुसऱ्या घरात जाऊन गॅलरीची उंची तसेच इतर गोष्टींची पाहणी केली. यानंतर चित्रा वाघ वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या. पण यावेळी त्यांचा संताप झाला आणि त्यांनी थेट पोलिसांसमोरच तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत टीका केली. महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात हे धूळ फेकत आहेत. लेखी परवानगी नसल्याचे सांगत आहे. जी दोन मुले प्रत्यक्षदर्शी होती, त्यांना तर सोडून दिले. हे प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे. लाज वाटली पाहिजे यांना, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी पोलीस स्थानकाबाहेर संताप व्यक्त केला.


निलेश राणे यांनी यावरुनही संताप व्यक्त केला आहे. पूजा चव्हाण हत्या प्रकरणामध्ये सौ. चित्राताई वाघ वानवडी पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक बघून आश्चर्य वाटलं. एक गुन्हेगार मंत्र्याला वाचवण्यासाठी पोलीस किती तत्पर आहेत यावरून लक्षात आले, अशी टीका त्यांनी केली आहे.

आमच्याकडे तक्रार नसल्याचे पोलीस सांगत आहेत. त्यांची भूमिका पहिल्या दिवसापासून अत्यंत संशयास्पद आहे. यांच्याकडून तपास काढून घेतला पाहिजे. राजकीय दबाबाखाली ते काम करत आहेत. मी माझ्या २२ ते २४ वर्षाच्या समाजकारणात हे पाहिले नसल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.