दोनच दिवसात कसोटी सामन्याचा निकाल; भारताने तिसरा कसोटी सामना 10 गडी राखत जिंकला


अहमदाबाद – इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्या भारतीय संघाने 10 गडी राखत विजय मिळवला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडप्रमाणेच भारतीय फलंदाजी कोसळल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी देखील अचूक गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजाना अक्षरशः लोटांगण घालायला लावले. फक्त 81 धावांवर इंग्लंडचा संपूर्ण डाव आटोपला त्यानंतर भारताला विजयासाठी 49 धावांचे आव्हान इंग्लंडने दिले होते. ते आव्हान भारताने अवघ्या 7.4 षटकात पूर्ण करत या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतील. भारताकडून रोहित शर्माने नाबाद 25 तर शुभमन गिलने 15 धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी भारतीय गोलंदाज अक्षर पटेल आणि आर अश्विन यांच्या फिरकी पुढे दुसऱ्या डावात इंग्लंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाहीत. अश्विनने 4 तर अक्षर पटेल ने 5 बळी घेतले. तर वॉशिंग्टन सुंदरने 1 बळी घेतला. इंग्लंडकडून बेन स्टोक ने सर्वाधिक 25 धावा केल्या.

दरम्यान दुसऱ्या डावांत तिसरा बळी घेत अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० व्या बळींची नोंद केली आहे. अश्विनने २१ हजार २४२ चेंडूमध्ये ४०० बळी घेतले आहेत. तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चरला बाद करत अश्विनने हा माईलस्टोन टप्पा गाठला. ४०० कसोटी बळींचा टप्पा गाठणारा एकूण १७ वा आणि भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. याआधी कपिल देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह या भारतीय गोलंदाजांनी हा विक्रम केला आहे. २०११ मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या अश्विन यानं ७७ व्या कसोटी सामन्यात ४०० बळींचा टप्पा पार केला आहे.