केरळमधील त्या वक्तव्यावरुन राहुल गांधींना कपिल सिब्बल यांनी फटकारले


नवी दिल्ली – केरळमध्ये काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झाला असून भाजपकडून राहुल गांधींचे हे वक्तव्य म्हणजे फोडा आणि राज्य करा नितीचा भाग असल्याची टीका करण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही यावरुन राहुल गांधींना फटकारले असून मतदारांच्या ज्ञानाचा सन्मान केला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. यावेळी राहुल गांधींवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनाही कपिल सिब्बल यांनी उत्तर दिले असून एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांचे दावे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

एकामागोमाग एक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव होऊ लागल्यानंतर नेतृत्वावर जाहीरपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांमध्ये कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. ते राहुल गांधी यांच्या वक्तव्यासंबंधी बोलताना म्हणाले की, राहुल गांधीच याबद्दल योग्य आणि विस्तृतपणे सांगू शकतील. काँग्रेस फोडा आणि राज्य करा धोरण अवलंबत असल्याचा भाजपचा आरोप हास्यास्पद आहे.

राहुल गांधी काय बोलले यावर भाष्य करण्यासाठी मी कोणीच नाही. त्यांनी वक्तव्य केले आहे आणि ते कोणत्या संदर्भात होते हे तेच सांगू शकतील. पण देशातील मतदारांचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यांच्या ज्ञानाचा अपमान करता कामा नये. कोणाला आणि का मतदान करावे याची त्यांना उत्तम जाण असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. देशाची विभागणी करण्याचा काँग्रेस प्रयत्न करत असल्याचा भाजपचा आरोप हास्यास्पद आहे. २०१४ मध्ये हे सरकार सत्तेत आल्यापासून लोकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप कपिल सिब्बल यांनी केला आहे.