हिंदू समाजाची पाकिस्तानी खासदाराने मागितली माफी


इस्लामाबाद – हिंदू समाजाची पाकिस्तानातील सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला माफी मागावी लागली आहे. सत्तेवर पंतप्रधान इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इन्साफ पक्ष आहे. इम्रान खान यांच्या पक्षाच्या आमिर लियाकत हुसैन या खासदाराला त्याने केलेल्या ट्विटमुळे माफी मागावी लागली, तसेच हिंदू समाजाचा अनादर करणारे ट्विटही डिलिट कराव लागले.

आमिर लियाकत हुसैन यांच्या ट्विटचा पाकिस्तानात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजाने मोठया प्रमाणावर निषेध केला व त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तेहरीक-ए-इन्साफकडून आमिर लियाकत हुसैन राष्ट्रीय सभागृहाचे सदस्य आहेत. आमिर लियाकत हुसैन यांनी विरोधी पक्षनेत्या मरीयन नवाज यांची खिल्ली उडवण्यासाठी हिंदू देवतेचा फोटो ट्विट केला. त्यावरुन या सर्व वादाला सुरुवात झाली. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मरीयम नवाज ही कन्या आहे.

टीव्हीवर निवेदक म्हणून हुसैन प्रसिद्ध आहेत. ते धार्मिक अभ्यासक म्हणूनही ओळखले जातात. पाकिस्तानातील हिंदू समाजाबरोबर तेथील राजकारण्यांनीही आमिर लियाकत हुसैन यांच्या ट्विटचा निषेध केला. अशा प्रकारचे ट्विट धार्मिक स्कॉलर म्हणवणाऱ्या व्यक्तीने करणे शोभत नाही. त्याच्या लज्जास्पद कृत्याचा आम्ही निषेध करतो, असे रमेश कुमार वाकंवानी म्हणाले. ते पाकिस्तानातील हिंदू परिषदेचेही प्रमुख आहेत.

आमिर हुसैन यांनी पाकिस्तानातील हिंदूंकडून झालेल्या निषेधानंतर ते ट्विट डिलिट केले व हिंदू समाजाची माफी मागितली. मला हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याची कल्पना आहे. माझा सर्व धर्मांवर विश्वास आहे, हेच मला माझ्या धर्माने शिकवल्याचे आमिर हुसैन म्हणाले.