मोदींचे सूचक वक्तव्य; देशातील राष्ट्रीयकृत बँकांचे होणार खासगीकरण ?


नवी दिल्ली: सर्वसामान्य जनतेपर्यंत केंद्र सरकारच्या जनधन किंवा पीएम किसान योजना तसेच इतर योजना पोहचवण्याचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या राष्ट्रीयकृत बॅंकांचे आता खासगीकरण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सरकारने सर्वच क्षेत्रात असण्याची गरज नसल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याने बँकांच्या खासगीकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सरकारने सर्वच क्षेत्रात असण्याची गरज नाही. व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही तर व्यवसायाला सहकार्य करणे ही सरकारची भूमिका असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिपम (DIPAM) विभागाच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटले.

देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर चर्चा सुरु झाली आहे. केंद्र या राष्ट्रीयकृत बँका सरकारच्या महत्वपूर्ण योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम करतात. या बँकांचे जर खासगीकरण केले तर केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहचणार असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.

मोदी सरकारच्या अजेंड्यावर सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाचा विषय आहे. टप्प्याटप्प्याने या बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना ‘बॅड बँके’चा विषय काढला होता. त्यामुळे ज्या बँका तोट्यात चालल्या आहेत, त्यांचे खासगीकरण होणार हे नक्की झाले होते. आता पंतप्रधान मोदींच्या या ताज्या वक्तव्यानंतर देशातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण होणार याचे संकेत मिळत आहेत.