फेसबुकने बॅन केले म्यानमारच्या लष्कराशी संबंधित सर्व अकाउंट्स


नेपिडो – म्यानमारमध्ये बंड करत सत्ता ताब्यात घेतलेल्या लष्कराविरोधात जनतेपाठोपाठ आता फेसबुकनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. म्यानमारच्या लष्करी प्रशासनाने काही दिवसांपूर्वी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर म्यानमारच्या लष्कराचे मुख्य पेज फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन डिलिट केल्यानंतर आता म्यानमारच्या लष्कराशी संबंधित सर्व अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट आणि लष्कर नियंत्रित कंपन्यांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची फेसबुकने घोषणा केली आहे. म्हणजे आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामची सेवा म्यानमारच्या लष्कराला वापरता येणार नाही.

ही बंदी बंडानंतर सत्ता ताब्यात घेतलेल्या लष्कराकडून झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे घालणे गरजेचे होते, टाटमाडॉने (म्यानमारच्या लष्कराने) फेसबुक किंवा इंस्टाग्रामचा वापर करणे घातक असल्याचे फेसबुकने एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे. फेसबुकने ही कारवाई हिंसाचाराला प्रतिबंध घालण्याच्या कायद्यांतर्गत केली. यापूर्वी रविवारी आंदोलनकर्त्यांवर झालेल्या गोळीबारामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतर लगेचच फेसबुकने, हिंसाचारास वारंवार प्रोत्साहन देणे आणि आमच्या प्लॅटफॉर्वरील नियमांचे सातत्याने उल्लंघन केल्यामुळे ‘टाटमाडॉ ट्रू न्यूज इन्फॉर्मेशन टीम’चे पेज डिलिट केल्याचे सांगितले होते.

निर्वाचित सरकार आणि त्याच्या नेत्या आंग सान सू ची यांना म्यानमारमध्ये १ फेब्रुवारीला लष्कराकडून हटवण्यात आले. देशभरात त्याला विरोध होत आहे. म्यानमारमधील दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले आहे. लष्करी सरकारने या पार्श्वभूमीवर, फेसबुकसारखे समाजमाध्यम वापरण्यावर बंदी आणली आहे. सू ची यांनी गेल्या दशकभर लष्कराशी जुळवून घेत सत्ता सांभाळली होती. पण आता लष्करशाहीला सुरूवात झाली आहे.