अतिउत्साहात पिंपरी चिंचवडच्या महापौरांचा विना मास्क रॅम्प वॉक


पुणे – पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतरही एका फॅशन शोचे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोंरे या फॅशन शोमध्ये सामील झाल्या आणि त्यांनी विना मास्क रॅम्प वॉकही केला. 200 पेक्षा जास्त लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि कोरोना नियमांचे उल्लंघन उपस्थितांकडून केल्याचेही निदर्शनास आले. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घेत महापौरांचे पूत्र जवाहर मनोहर ढोरेंविरोधात कलम 188 अंतर्गत खटला दाखल केला आहे. यापूर्वी, महापौर उषा ढोरे यांच्याविरोधात कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील केली होती. पिंपरी चिंचवडमधील प्राध्यापक रामकृष्ण मोरे ऑडिटोरियममध्ये सोमवारी या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. 200 पेक्षा जास्त लोक या शोमध्ये सामील झाले होते आणि त्यातील अनेकांनी मास्क घातला नव्हता. फॅशन शोदरम्यान एक डान्सचा प्रोग्रामही झाला, यातही कुणीच मास्क घातले नव्हते.