गाईच्या पोटात तब्बल ७१ किलो प्लास्टिकसह सापडले नाणी, काचेचे तुकडे, स्क्रू, पिन, सुई अशा अनेक गोष्टी


फरिदाबाद – फरिदाबाद येथे झालेल्या एका दुर्घटनेत जखमी झालेल्या गाईवर नुकतीच सर्जरी करण्यात आली असता या सर्जरी दरम्यान डॉक्टरही चक्रावून गेले. जवळपास चार तास गाईवर सर्जरी सुरु होती. गाईच्या पोटात यावेळी तब्बल ७१ किलो प्लास्टिकसह नाणी, काचेचे तुकडे, स्क्रू, पिन, सुई अशा अनेक गोष्टी आढळल्या. आपल्या सर्वांनाच जागे करणारी ही घटना असल्याचे डॉक्टर म्हणाले आहेत.

डॉ. अतुल मौर्य यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना तीन सदस्यांची एक टीम गाईवर सर्जरी करण्यासाठी तयार करण्यात आली होती. गाईवरील सर्जरी यशस्वी झाली असली तरी गाय अद्यापही धोक्यात आहे. गाईसाठी पुढील १० दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत,अशी माहिती दिली आहे.

ही गाय एका कारने दिलेल्या धडकेत जखमी झाली होती. जनावरांच्या देवाश्रय रुग्णालयात गाईला नेण्यात आले. यावेळी गाय आपल्या पोटावर लाथ मारत असल्याचे डॉक्टरांना आढळले. गाईला पोटदुखीमुळे प्रचंड वेदना होत होत्या. डॉक्टरांनी काही चाचण्या आणि एक्स-रे काढल्यानंतर पोटात धोकादायक गोष्टी असल्याचे समोर आल्यानंतर सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाईचे पोट साफ करण्यासाठी आम्हाला चार तास लागले. यामध्ये प्लास्टिक सर्वाधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याशिवाय नाणी, काचेचे तुकडे, स्क्रू, पिन, सुई अशा अनेक नष्ट न होणाऱ्या गोष्टीही सापडल्या आहेत. आपल्या सर्वांसाठीच ही धोक्याची घंटा असल्याचे ते म्हणाले आहेत.