पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांना फासला हरताळ


पुणे – मागील काही दिवसात देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आपल्या राज्यात देखील अशीच परिस्थिती असून त्या पार्श्वभूमीवर सभा, आंदोलन आणि बाहेर गर्दी करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले असतानाही आज पुण्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोडवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी वानवडी पोलिस स्टेशन बाहेर भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

पण या आंदोलन दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी कोरोना नियमावलीला अक्षरशः हरताळ फासला होता. या आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी मास्क घातले नव्हते. त्याचबरोबर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन न केल्यामुळे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला एक प्रकारे केराची टोपली दाखविण्याचे काम केले आहे.

18 दिवस पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या करून होत आले आहेत.शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल केला जावा. अशी मागणी भाजपकडून सतत होत आहे. तर आज त्याच दरम्यान भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर वानवडी पोलिस स्टेशन आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन संजय राठोड यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली.

पण समाधानकारक उत्तर पोलिस आयुक्तांकडून न मिळाल्याने, चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काही वेळात वानवडी पोलिस स्टेशन बाहेर संजय राठोडवर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी आंदोलन केले. तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

राघवेंद्र मानकर यावेळी म्हणाले की, संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. राठोड यांच्यावर जोवर कारवाई होत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. सभा किंवा आंदोलन करू असे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. त्यावर ते म्हणाले की, आम्ही नियमांचे उल्लंघन केले असेल तरी आम्हाला चालेल, पण आम्हाला काही करून त्या युवतीला न्याय द्यायचा असल्याची भूमिका त्यावर त्यांनी मांडली. संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीचा तक्रार अर्ज भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी वानवडी पोलीस स्टेशनचे एस. साळगावकर यांच्याकडे दिला.