स्फोटकांनी भरलेली गाडी मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली


मुंबई : एक संशयास्पद गाडी प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया हाऊस या घराच्या परिसरात आढळून आली असून जिलेटीनचा साठा या गाडीत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांचे पथक, फॉरेन्सिक टीम या घटनेनंतर घटनास्थळी दाखल झाले. तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि गाडीची त्यांनी तपासणी केली. जिलेटीनच्या कांड्यांचा साठा या गाडीतून जप्त करण्यात आला आहे. ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याने घातपाताचा उद्देश असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने मुंबई पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच ही गाडी कोणाची आहे, त्याचा मालक कोण आहे, याचा तपासही पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

जिलेटीनने भरलेली ही गाडी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या घरापासून काही अंतरावर आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांवरही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.