मोदी सरकारने दूर केला इम्रान खान यांच्या श्रीलंका दौऱ्यातील अडथळा


नवी दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विमानाला आपल्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्यासाठी भारताने परवानगी दिली आहे. यासंदर्भात एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पहिल्यांदाच श्रीलंका दौऱ्यावर इम्रान खान जाणार असून यावेळी त्यांचे विमान भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार आहे. इम्रान खान यांचा २३ फेब्रुवारी रोजी श्रीलंका दौरा नियोजित आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी २०१९ मध्ये पाकिस्तानाने नाकारली होती. अमेरिका आणि सौदी अरेबिया दौऱ्यावर नरेंद्र मोदी असताना ही परवानगी नाकारण्यात आली होती. काश्मीरमध्ये मानवाधिकार हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत पाकिस्तानने भारताला नकार दिला होता.

भारताने आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थेसमोर व्हीव्हीआयपी विमानाला परवानगी नाकारण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. सामान्य परिस्थितीत व्हीव्हीआयपी विमानांना उड्डाणासाठी देशांकडून परवानगी दिली जाते. पण पाकिस्तानने परवानगी नाकारणे नियमाचे उल्लंघन असल्याचा आक्षेप भारताने घेतला होता.