कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्या भाविकांना साईबाबांच्या दरबारात प्रवेश नाही


शिर्डी – पुन्हा एकदा कोरोनाचे जाळे महाराष्ट्रात वेगाने पसरत चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्यामुळे राज्यातील बहुतेक शहरांमध्ये कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर गेल्या अनेक महिन्यानंतर राज्यात उघडण्यात आलेली मंदीरे पुन्हा एकदा बंद करण्यास सुरुवात झाली आहे. पण, शिर्डीचे साईमंदीर खुलेच ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. पण, साई संस्थानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी काही अटी तयार केल्या आहेत. या अटींचे पालन न करणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिली जाणार नाही.

गेल्या तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात लॉकडाऊन लागल्यानंतर अनेक अटी व नियमांसह साई मंदीर उघडण्यात आले होते. पण, कोरोनाचे संकट राज्यात गडद होण्याची शक्यता असल्यामुळे मंदीर पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये म्हणून साई संस्थानकडून कठोर पावले उचलली जात आहेत. नव्या अटीनुसार, एका दिवसात केवळ 15 हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. त्याआधी भाविकांना ऑनलाईन दर्शनपास घ्यावा लागणार आहे. पास असल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

तसेच मास्‍कचा वापर न करण्‍याऱ्या साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. याशिवाय, जेष्ठ नागरिकांसह दहा वर्षाखालील मुलांनाही प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात पुजेचे साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे. सर्व साईभक्‍तांनी आपली होणारी गैरसोय टाळण्‍याकरीता ऑनलाईन दर्शनपास उपलब्‍ध करुन निर्धारीत वेळेत दर्शनासाठी शिर्डीत यावे. महत्वाचे म्हणजे, जे साईभक्‍त आजारी आहेत, अशांनी दर्शनाकरीता येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.