मुलाच्या लग्नादरम्यान कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्या माजी खासदार महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा


पुणे – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे राज्यातील काही शहरात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. तर प्रशासनाकडून लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम यासाठी नियमावली देखील जारी केलेली आहे. पण असे असताना देखील कोरोनाचे नियम काही राजकीय मंडळींकडूनच पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचे नियम माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात मोडल्याप्रकरणी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे कोरोनाबाबत सूचना करत असताना दुसरीकडे मात्र, त्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले. कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा विवाह दोन दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पुण्यात पार पडला. अनेक राजकीय नेत्यांनी यावेळी उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे या सोहळ्यात यावेळी हजारोंच्या संख्येने लोक दाखल झाले होते. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला. तर बऱ्याच जणांनी तोंडाला मास्क देखील लावले नव्हते. दरम्यान, याप्रकरणी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि निरीक्षक बाळकृष्ण कदम अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.

तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनाच कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार सरोज आहेर यांच्या मुलाचे ही रविवारी मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या लग्नाला उपस्थिती लावली होती. दरम्यान, छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे २२ फेब्रुवारी रोजी समोर आल्यामुळे भुजबळ यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनीच कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या संपर्कात येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आता क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.