अजित पवारांच्या बारामतीतच कोरोना नियमांची पायमल्ली


पुणे : कोरोनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आदेश धड्कावून लावण्याचा प्रकार त्यांचाच मतदार संघ असलेल्या बारामतीतच उघडकीस आला होता. बारामतीत सोमवारी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयाला मिळाले होते. प्रशासनावर या प्रकारानंतर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवली जात होती. पण आता बारामती पोलिसांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला असून कोरोना नियम धाब्यावर बसवत गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

बारामतीत सोमवारी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयाला मिळाले होते. सर्वांनाच कोरोनाच्या नियमांचा विसर पडल्याचे चित्र यावेळी दिसत होते. अजित पवारांनी बारामतीत झालेल्या कार्यक्रमात कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले होते. कोरोनाची भीती संपल्यासारखे अनेकजण मास्क न वापरता वावरत आहेत. मास्कचा वापर, सॅनिटायझर्सचा वापर करणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शासनाने गर्दीबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी नियमावलीचे सर्वांनी पालन करावे. एकदा कोरोना झाला की पुन्हा कोरोना होणारच नाही, अशा समजूतीत राहू नका, दोनदा नाही काहींना तर तीनदा कोरोना झाल्याचीही उदाहरणे असल्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी, असा इशारा देखील पवार यांनी दिला होता.

याबाबत माहिती देताना बारामती पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर म्हणाले, सोमेश्वर कारखाना निवडून अर्ज भरण्यासाठी प्रशासकीय भवनमध्ये गर्दी करणाऱ्याची माहिती घेतली जात असून माहिती पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.