भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर श्रीधरन यांनी साधला दिशा रवीवर निशाणा


नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून भारताचे मेट्रो मॅन ई. श्रीधरन प्रचंड चर्चेत आहेत. भाजपमध्ये श्रीधरन हे प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेक विषयांवर त्यांनी आपले मत मांडले. २१ फेब्रुवारी रोजी श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक देशभक्त म्हणून चांगले सरकार देणे आणि देशाच्या एकतेला तसेच सुरक्षेला बाधा पोहचवणाऱ्या विषयांसंदर्भात कठोर करावाई करणे आपले काम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्रीधरन यांनी दिशा रवी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल अ‍ॅक्टीव्हीझमसंदर्भातही कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे असे मत मांडले आहे.

श्रीधरन यांनी केरळमध्ये एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. डिजिटल अ‍ॅक्टीव्हीझम हे अपायकारक असल्याचे मत श्रीधरन यांनी नोंदवले आहे. शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे टूलकिट शेअर केल्याबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली दिशा रवी या २१ वर्षीय पर्यावरणवादी तरुणीला अटक करण्यात आली आहे. याचसंदर्भातील प्रश्नावर बोलताना श्रीधरन यांनी असे डिजिटल कार्यकर्ते हे खोडकर असल्याचे म्हटले आहे.

यांच्यामुळे देशाची प्रतिमा मलीन होते. अशा गोष्टींविरोधात तातडीने कारवाई केली पाहिजे. त्यांना तुरुंगामध्ये टाका, असे मी म्हणत नाही. पण देशाच्या मान सन्मानाला हानी पोहचवणाऱ्यांविरोधात कारवाई केली पाहिजे, असे श्रीधरन यांनी म्हटले आहे. श्रीधरन यांनी यावेळी सीएएविरोधात झालेल्या आंदोलनाचीही गरज नसल्याचे मतही व्यक्त केले आहे. हे अडचणी निर्माण करणारे घटक असल्याचे आंदोलनकर्त्यांबद्दल बोलताना श्रीधरन यांनी म्हटले आहे. हे असे लोक आहेत, जे मोदी सरकारच्या कामावर समाधानी नाहीत. मोदी सरकारने काहीही केले तरी त्याला विरोध केला जातो. सरकारसोबत हातमिळवणी करुन सराकात्मक टिकेच्या माध्यमातून सुधारणा करता येतील, पण हे लोक आंदोलन करुन अडचणी का निर्माण करतात?, असा प्रश्न श्रीधरन यांनी उपस्थित केला.

केरळमधील बहुतांश लोकांच्या लव्ह जिहाद आणि गोमांस खाणे या दोन्ही गोष्टी विरोधात आहेत. असे विषय मुद्दाम चर्चेत आणले जातात. लोकांमध्ये अशा विषयांमुळे मतभेद निर्माण होतात. त्यामुळेच या विषयांकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे मत श्रीधरन यांनी व्यक्त केले आहे.