कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडेंच्या बैठकीला परवानगी नाकारली


कोल्हापूर : रायगडवरील सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा याबाबत करावयाच्या योजनांबाबत संभाजी भिडे यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. पण या बैठकीला परवानगी नाकारण्यात आली आहे. वेळापत्रकानुसार करवीर तालुक्यातील वडणगे या गावात ही बैठक होणार होती. विशेष म्हणजे शिवप्रतिष्ठानमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच बैठकीचे आयोजन करण्यात येणार होते. पण, कोरोना प्रादुर्भावाचे कारण देत या बैठकीला परवानगी नाकारण्यात आली आहे.

रायगडावर सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा या विषयांवर संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानतर्फे एक बैठक होणार होती. या बैठकीचे आयोजन करवीर तालुक्यातील वडणगे या गावात करण्यात आले होते. शिवप्रतिष्ठानमध्ये मागील काही दिवसांपूर्वी फूट पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व होते. पण, राज्यात सध्या कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोना संसर्ग गावपातळीपर्यंत पोहोचला असल्यामुळे शिवप्रतिष्ठानच्या या बैठकीला प्रशासनातर्फे परवानगी नाकारण्यात आली.

देशभरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही कट्टर हिंदुत्ववादी संघटना म्हणून ओळखली जाते. संभाजी भिडे गुरुजींच्या आदेशावर चालणाऱ्या या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दबदबा आहेत. शिवप्रतिष्ठानची अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत भरभक्कम अशी ओळख आहे. पण मागील 20 वर्षांपासून शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक म्हणून काम पाहणारे नितीन चौगुले यांना काही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले. त्यानंतर शिवप्रतिष्ठान संघटनेतील कलह समोर आला. शिवप्रतिष्ठानकडून राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी 5 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून नितीन चौगुले यांना निलंबित करत काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, या बैठकीत रायगडवरील सुवर्ण सिंहासन, खडा पहारा यासोबतच शिवप्रतिष्ठानची पुढची दिशा कोणती?, गृहकलाबाबतची भूमिका या सर्व गोष्टींवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण, प्रशासनाने या बैठकीला परवानगी न दिल्यामुळे शिवप्रतिष्ठानची काय भूमिका असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.