इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील एमएमआर रिजनमध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढीचा निर्णय


मुंबई : ऑटो रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये करण्याचा निर्णय एमएमआर रिजनमध्ये झाला आहे. हा निर्णय परिवहन आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्यामुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. पण, भाडेवाढीचा निर्णय होत असल्यामुळे आता त्यांना दिलासा मिळाला आहे. इंधन दरवाढीचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात करण्यात आली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान, या भाडेवाढीची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब करणार असल्याची माहिती मिळत आहे. वाढलेल्या भाड्यानुसार आता ऑटो रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये होणार आहे. हा निर्णय परिवहन आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे अनेक रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी स्वागत केले आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलने तर शंभरी गाठली आहे. अशावेळी रिक्षा आणि टॅक्सी संघटना भाडेवाढीची मागणी करत होते. या संघटना त्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या. भाडेवाढीच्या निर्णयामुळे या संघटनांना दिलासा मिळाला आहे. पण, आधीच पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.