रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत साताऱ्यात संचारबंदी


सातारा: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, अशा सूचना ठाकरे सरकारकडून वारंवार देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यांत आता संचारबंदी लागू करण्यात येत आहे. कोरोनाचा पुढील धोका लक्षात घेता साताऱ्यातही रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांना वगळण्यात आले आहे.

पोलिसांची फिरती गस्त पथके सध्या लग्नसराई आणि शाळांमध्ये सोशल डिस्टन्स पाळला जात आहे का? यासाठी तैनात करण्यात आली आहेत. राजकीय कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर यापुढील काळात निर्बंध आणले असून, यामध्ये सोशल डिस्टन्सिंग तसेच 50 व्यक्तींची मर्यादा करण्यात आली आहे. परिस्थितीनुसार 1 मार्चपर्यंत यात बदल केले जाणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मागील काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा वाढ होत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. सातारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून येथील प्रशासन सतर्क झाले आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार फक्त सातारा जिल्ह्यापर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. कोरोनाचे रुग्ण मान, खटाव, कोरेगाव अशा तालुक्यांतसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. कोरोनाचे अनेक हॉटस्पॉट या तालुक्यांत तयार झाले आहेत. या तालुक्यातील एका गावातील चार रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. पुण्यातील विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये राज्यात झपाट्याने वाढ होत असून पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत असल्यामुळे राज्य सरकार, तसेच आरोग्य विभागाने नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांनी हे नियम पाळले नाहीत, तर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते, असे सूतोवाच सरकारमधील अनेक मंत्र्यांनी केले आहे. राज्यात त्याच पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान आगामी काळात कोरोना रुग्णांमध्ये अशाच प्रकारे वाढ झाली तर प्रशासन कठोर निर्णय घेऊ शकते.