नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगार संरक्षणाची भूमिका


मुंबई : जय जवान, जय किसान यासोबतच जय कामगार अशी घोषणाही महत्त्वाची आहे. कामगार हा देशाचे अर्थचक्र चालवतो त्यामुळे गुंतवणुकीच्या जोडीने रोजगार किती निर्माण होतो आणि या कामगार वर्गाचे संरक्षण यालाही तितकेच महत्त्व आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान अशी घोषणा दिली. पण माझे वडील बाळासाहेब नेहमी म्हणायचे की या जोडीने जय कामगार ही घोषणा पण महत्त्वाची आहे. कारण जसे शेतकरी पीक पिकवतो व खाऊ घालतो, जवान हे देशाच्या सीमेचे संरक्षण करतात तसेच कामगार हा अर्थचक्र चालवतो. त्यांना पुरेसे संरक्षण मिळालेच पाहिजे. उद्योगांतून केवळ किती भांडवल येते हे महत्त्वाचे नाही तर रोजगार निर्मिती किती झाली त्याला महत्त्व आहे असेही ते म्हणाले. केंद्र सरकारने यादृष्टीने कामगारांना संरक्षण मिळेल, असे पाहिले पाहिजे.