कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई महानगरपालिका अॅक्शन मोडमध्ये


मुंबई : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई महानगरपालिका अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यात महानगरपालिकेकडून मागील दोन दिवसांपासून रेस्टॉरन्ट्स बार आणि हॉटेल्सवर कारवाई धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. काल रात्रीच्या सुमारास वांद्रे आणि खार परिसरातील पाच रेस्टॉरन्ट, बार आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण 650 जणांवर कारवाई करत महानगरपालिकेने 1 लाख 40 हजारांचा दंड वसूल केला आहे. वांद्रे येथील 145 कॅफे अॅण्ड बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. यात सदर व्यवस्थापनावर संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात एच वॉर्डच्या आरोग्य खात्यातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

188, 269 कलमांतर्गत यात काही कॅफे अॅण्ड बारवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत वांद्र्यातील आयरिश हाऊस, खार स्टेशनजवळील क्वॉर्टर पिलर, थ्री वाईस मंकी आणि यू-टर्न लाऊन्जमध्ये देखील महानगरपालिकेकडून तपासणी करण्यात आली. ज्यात मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंग आणि विना मास्क असलेले ग्राहक आढळल्यामुळे त्यांच्यावर देखील महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली गेली आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे महानगरपालिकेकडूनही वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही, तोपर्यंत कारवाई सुरुच राहणार असल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.

रुग्णसंख्या नियंत्रणात यावी म्हणून मुंबई महानगरपालिकेने नियम आणखी कडक केले असून मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई अधिक कडक केली आहे. रुग्णवाढी मागे स्थानिकांचा हलगर्जीपणा हे सुद्धा एक कारण असल्याचे मुंबईच्या महापौरांनी सांगितल्यामुळे प्रशासनासोबत आपण सुद्धा आपली काळजी आणि खबरदारी घेणे गरजेचे आहे.