इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा


नवी दिल्ली – इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव, युवा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन तसेच राहुल तेवतिया यांची भारतीय संघात निवड करण्यात आल्यामुळे सूर्यकुमारचे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न अखेर साकार होणार आहे.

सूर्यकुमारला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी केल्याचे फळ मिळाले आहे. मुंबई इंडियन्सकडून चमकदार कामगिरी करणारा किशन हा ऋषभ पंतनंतर भारतीय संघातील दुसरा यष्टीरक्षक असेल. सूर्यकुमारने ‘आयपीएल’च्या १३व्या पर्वात ४८० तर किशनने ५१६ धावा केल्या होत्या. तेवतियाने राजस्थान रॉयल्सकडून शानदार कामगिरी केली होती.

डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव आणि मनीष पांडे यांना संघातून डच्चू देण्यात आला असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकलेला उपकर्णधार रोहित शर्माचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

भारतीय टी-२० संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, इशान किशन, यजुर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.