केंद्र सरकारने कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज – उद्धव ठाकरे


मुंबई : महाराष्ट्रासह पाच राज्यांतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील उपनगरीय रेल्वे, रस्ते वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणली.

कार्यालयीन कामकाजाच्या वेळेची सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही पारंपरिक मानसिकता बदण्याची आवश्यकता असून वेगवेगळ्या वेळांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण आखावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून नीती आयोगाची सहावी बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री ठाकरे या बैठकीत सहभागी झाले होते. मुंबईत केंद्र सरकारची कार्यालये, बँका यांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी करोना निर्बंध शिथिल झाल्यापासून करण्यात येत आहे. सकाळी आणि सायंकाळी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये सरकारी कार्यालयांमुळे गर्दी होते. ती टाळण्यासाठी केंद्राने आपल्या कार्यालयांच्या वेळा बदलण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी महाराष्ट्रासह केरळ, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत असल्याची माहिती दिली. केवळ महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमधील एकूण रुग्णांपैकी सक्रिय रुग्णांचे प्रमाण ७५.८७ टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

गेल्या सात दिवसांपासून छत्तीसगडमध्ये देखील दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत २५९ जणांना संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. केरळमध्येही दररोज रुग्णसंख्येत वाढ होत आहे, महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गेल्या सात दिवसांत पंजाबमध्येही दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली. या राज्यांत गेल्या २४ तासांत ३८३ रुग्णांची नोंद झाली. मध्य प्रदेशमध्येही १३ फेब्रुवारीपासून कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे, गेल्या २४ तासांत २९७ जणांना संसर्ग झाला. दरम्यान, गेल्या २४ तासांत १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.