या वस्तूही खाण्याजोग्या..!

eat
मानव जसजसा प्रगत होत गेला, तसतश्या याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, आहार हे ही बदलत गेले. आपल्या पूर्वजांच्या आहारामध्ये असलेल्या अनेक वस्तू कालबाह्य होत गेल्या आणि त्यांची जागा नवनवीन खाद्यपदार्थांनी घेतली. पण या पदार्थांचे सर्वच भाग खाण्यासाठी वापरले न जाता, केवळ काहीच भाग वापरले जाऊन, उरलेला भाग खाता येण्याजोगा नसल्याचे समजून टाकून दिला जातो. पण अन्नपदार्थांचे टाकून दिलेले भागही वास्तविक खाता येऊ शकतात. अश्याच काही पदार्थांची ओळख करून घेऊ या.
eat1
चीनमध्ये पक्षांच्या घरट्यांचे सेवन केले जाते. किंबहुना हा एक अतिशय खास पदार्थ समजला जातो. पक्षांच्या लाळेपासून तयार झालेली ही घरटी चीनमध्ये मोठ्या किंमतीला विकली जात असून, ही अतिशय पौष्टिक समजली जातात. गेली चारशे वर्षे अश्या प्रकारच्या घरट्यांचा वापर चायनीज खाद्यसंस्कृतीमध्ये केला जात आला आहे. आजच्या काळामध्ये सर्वात महाग असणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये या घरट्यांचा समावेश आहे. या घरट्यांच्या एका पौंड वजनाची किंमत तीन हजार डॉलर्सपेक्षाही अधिक आहे. या घरट्यांची प्रत, रंग आणि आकारावरून त्यांची किंमत ठरविली जाते. चायनीज खाद्यसंस्कृतीमध्ये निरनिराळ्या सूप्समध्ये या घरट्यांचा वापर करण्याची पद्धत आहे.
eat2
सध्या सतत येत असलेल्या नित्य नव्या फूड ट्रेंड्समध्ये समावेश झाला आहे चक्क निवडूंगाचा. ‘ऑप्त्यूनिया’ प्रजातीच्या निवडुंगाचा वापर सध्या सुपरफूड म्हणून करण्यात येत आहे. मेक्सिकोमध्ये या निवडुंगाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या निवडुंगाला या ठिकाणी ‘नोपेल्स’ या नावाने ओळखले जाते. या निवडूंगाला लहान लहान फळे येत असून, याचा स्वाद काहीसा आंबट असतो. ही फळे कच्ची किंवा शिजवून खाल्ली जाऊ शकतात. त्याचप्रमाणे स्ट्यू, सॅलड आणि सूप्स सारख्या पदार्थांमध्ये या निवडुंगाचा वापर करण्यात येतो. तसेच याचा वापर जॅम, लोणचे, चहा, कँडी इत्यादी पदार्थ बनविण्यासाठी देखील केला जातो.
eat3
अंडे उकडून, ते सोलून त्याची साले आपण टाकून देतो, आणि अंड्याचे सेवन करतो. पण वास्तविक अंड्याची टरफले देखील खाल्ली जाऊ शकतात. इतकेच नाही, तर ही टरफले कॅल्शियम, स्त्रोंटीयम आणि फ़्लुओरिनचे उत्तम स्रोत आहेत. या टरफलांची पूड करून घेऊन त्यांचे सेवन केल्यास ओस्टीयोपोरोसीस, सांधेदुखी कमी होऊन हाडांची घनता वाढण्यास मदत होते, तसेच हाडांचा क्षय टळतो. मासिक पाळी बंद झालेल्या महिलांना अंड्यांच्या टरफलांचे सेवन विशेष फायद्याचे असल्याचे एका शोधामध्ये म्हटले आहे.

Leave a Comment