चाखून पाहा आगळी वेगळी भारतीय मिष्टान्ने

sweet
भारतीय मिष्टान्ने जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. भारतामध्ये परंपरा आणि रीतीरिवाजांची जितकी विविधता आहे, तितकीच विविधता बहुधा निरनिराळ्या ठिकाणची खासियत असलेल्या मिष्टान्नांची देखील आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्राची पुरणपोळी किंवा मोदक खास आहे, त्याचप्रमाणे बंगालचे रसगुल्ले, आणि राजस्थानचे घीवर देखील खासच आहेत. आपण मात्र जाणून घेणार आहोत अश्या मिष्टान्नांबद्दल जी खास आहेतच, मात्र ज्या ठिकाणी ती बनविली जातात, त्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणी फारशा परिचयाची नाहीत.
sweet1
‘एलानीर पायसम’ ही एक प्रकारची खीर केरळ आणि दक्षिण तमिळनाडूची खासियत आहे. नारळाच्या कोवळ्या खोबऱ्या(मलई) च्या आणि कंडेन्स्ड मिल्कच्या मिश्रणाने ही चविष्ट खीर बनविली जाते. केवळ दुर्गा पूजेच्या वेळी कलकत्त्यातील काहीच हलवायांकडे उपलब्ध असणारी अशी ही मिठाई म्हणजे ‘सरभाजा’. कंडेन्स्ड मिल्क पासून तयार करण्यात येणारी ही मिठाई काहीशी अभावानेच मिळणारी दुर्मिळ मिठाई आहे. ‘गोकाक कर्दंट’ ही मिठाई कर्नाटकातील गोकाकची खासियत. साजूक तुपामध्ये बनविलेल्या या मिठाईमध्ये गूळ, बेदाणे, काजू, शेंगदाणे, जायफळ, इतर सुका मेवा आणि खाण्याचा डिंक वापरण्यात येतो.
sweet2
बिहारची खासियत असलेली ‘परवल मिठाई’ ही तोंडल्या प्रमाणे दिसणाऱ्या ‘परवल’ नामक भाजीमध्ये खावा भरून तयार केली जाते. तर पनीर पासून तयार करण्यात येणारी खास ओडिया मिठाई आहे ‘छेना पोडा’. ‘छेना’ म्हणजे पनीर आणि ‘पोडा’ म्हणजे भाजणे. पनीर मळून घेऊन त्यामध्ये सुका मेवा आणि साखर घालून घेऊन त्यानंतर भट्टीमध्ये भाजून घेऊन ही मिठाई तयार करण्यात येते. साबुदाणा आणि तांदळाच्या कण्या नारळाच्या दुधामध्ये गूळ घालून शिजविल्या गेल्यानंतर तयार झालेल्या मिठाईला ‘अदा प्रधमन’ या नावाने ओळखले जाते. केरळमध्ये ओणमच्या दिवशी आवर्जून तयार केली जाणारी ही मिठाई आहे.
sweet3
गोव्याची खासियत असलेली ‘बेबिंका’ ही मिठाई तयार करणे हे मोठे कष्टाचे काम आहे. या मिठाईचा प्रत्येक पदर वेगळा शिजविला जातो. आणि त्यानंतर अनेक layers असलेली, केक प्रमाणे दिसणारी चविष्ट बेबिंका ही मिठाई तयार होत असते. छत्तीसगडची खासियत आहे ‘देहरोडी’ नामक मिठाई. तांदूळ आणि दह्याचे मिश्रण असलेल्या लहान लहान पुऱ्या साजूक तुपामध्ये तळून घेऊन साखरेच्या पाकमध्ये मुराविल्या जातात. या मिठाई सोबत थंडगार ताक प्यायला देण्याची पद्धत आहे.

Leave a Comment