आज आपले आयुष्य, अनेक दशकांपूर्वी लागलेल्या वैज्ञानिक शोधांमुळे खूपच सोपे झाले आहे. घड्याळ, रेफ्रिजरेटर, पासून ते मोठमोठ्या वैद्यकीय शोधांपर्यंत अनेक लहान मोठ्या गोष्टींच्या विना आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. पण विचार करण्याजोगी गोष्ट अशी, की ज्याकाळी या गोष्टींचे शोध लावले गेले नव्हते, त्या काळी सर्वसामान्यांचे आयुष्य कसे होते? किती वाजले असावेत हे जाणून घेण्यासाठी किंवा पटकन खराब होणारे खाद्यपदार्थ टिकून राहावे यासाठी हे लोक कोणते उपाय करीत असावेत? याच बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
अलार्म क्लॉक किंवा गजराचे घड्याळ ही मोठी महत्वाची गोष्ट आहे. सकाळी लवकर उठायचे असेल, किंवा एखाद्या कामाची वेळ टळू नये यासाठी गजराचे घड्याळ मोठे उपयोगी पडत असते. आजकाल अलार्म आणि ‘रिमाइंडर’ आपल्या मोबाईल फोनवर देखील ‘सेट’ करता येण्याची सोय झाली असल्यामुळे आपले काम आणखीनच सोपे झाले आहे. मात्र गजराची घड्याळे अस्तित्वात येण्यापूर्वी झोपेतून वेळेवर उठविण्यासाठी वापर होत असे ‘नॉकर अप’चा. ही एखादी वस्तू नसून, हे एका माणसाचे काम असे. हातामध्ये एक मोठी काठी घेऊन हा ‘नॉकर अप’ सर्वांची दारे किंवा खिडक्यांवर काठीने ‘नॉक’ करीत असे, म्हणजेच आवाज देत असे. त्या काळी शहरांमध्ये किंवा गावांमध्ये अश्या प्रकारच्या ‘नॉकर्स अप’ ची व्यवस्था पाश्चात्य देशांमध्ये रूढ होती. आपापल्या ‘क्लायंटस्’ ना वेळेवर झोपेतून जागे करण्याची जबाबदारी या लोकांवर असे, आणि आपले काम ते चोखपणे बजावीत असत.
आजकाल त्वचेवरील केस हटविण्यासाठी रेझरचा वापर सर्रास केला जातो. पण हे रेझर अस्तित्वात येण्याआधी प्राचीन काळी शिंपले, किंवा शार्क माश्यांचे दात अणकुचीदार केले जाऊन यांचा वापर रेझर प्रमाणे केला जात असे. अश्या प्रकरच्या रेझर्सच्या चित्राकृती काही प्राचीन गुहांमध्ये इतिहासकारांना सापडल्या आहेत. काही आदिवासी जमाती आजही अश्या रेझर्सचा वापर करीत असतात. त्यानंतरच्या युगामध्ये पितळेची किंवा ‘ओब्सीडीयन’ नामक दगडाची रेझर्स वापरली जाऊ लागली असून, ही रेझर्स अंडाकृती दिसत असत. १७४० साली स्टीलने बनविल्या गेलेल्या रेझरची निर्मिती इंग्लंडमधील शेफिल्ड येथे बेन्जामिन हंटस्मन यांनी केली. जे स्टील या रेझरची ब्लेड बनविण्यास वापरले गेले, त्याला आजही शेफिल्ड स्टील या नावाने ओळखले जाते.
१७७० साली ब्रिटीश इंजिनियर एडवर्ड नेअर्न यांनी रबराच्या ‘इरेझर’चा, म्हणजेच खोडरबराचा शोध लावला. पण तत्पूर्वी कडा नसलेल्या ब्रेडचा वापर खोडण्यासाठी केला जात असे. खोडरबराचा शोध लागल्यानंतरही अनेक वर्षे जपान मध्ये शाईचे लिखाण खोडण्यासाठी ब्रेडचाच वापर केला जात असे. कोळश्याच्या आणि शिसाच्या रेघा खोडण्यासाठी मेण, तर भूर्जपत्रावरील शाईचे लिखाण खोडण्यासाठी सँडस्टोन किंवा प्युमिस स्टोनचा वापर केला जात असे.
रेफ्रिजरेटर अस्तिवात येण्यापूर्वी फिनलंड आणि रशिया येथे दुध नासू नये, म्हणून दुधामध्ये बेडूक घालून ठेवण्याची पद्धत होती. हे बेडूक विशिष्ट प्रजातीचे असत. अनेक शतके ही पद्धत या देशांमध्ये चालत आली होती. २०१२ साली या संदर्भात मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये केल्या गेलेल्या रिसर्च मध्ये असे आढळून आले, की बेडकांच्या शरीरामध्ये, काही खास प्रतिजैविक तत्वे असलेली विशिष्ट अमिनो अॅसिड्स असल्याने ती, दुधामध्ये किंवा इतर लवकर नासणाऱ्या पदार्थांमध्ये जिवाणूंची निर्मिती रोखण्यास समर्थ आहेत. म्हणूनच दुधासारख्या पदार्थांमध्ये, ते लवकर खराब होऊ नयेत या साठी जिवंत बेडूक घालून ठेवण्याची पद्धत अस्तित्वात आली असावी.