कहाणी ‘खिचडी’ची…

khichadi
पचायला सोपा, अतिशय चवदार, झटपट तयार होणारा आणि पोटभरीचा पदार्थ म्हणजे खिचडी. सोबतीला पापड आणि एखादी लोणच्याची फोड असली, की चविष्ट भोजन तयार. अश्या या खिचडीचा इतिहासही मोठा रोचक आहे. हा पदार्थ आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये अगदी पुरातन काळापासून चालत आला असल्याचे उल्लेख सापडतात. इतकेच नाही, तर यामध्ये चवीला गोड आणि तिखट असे वैविध्यही दिसून येते. असा हा पदार्थ ‘संपूर्ण, संतुलित भोजन’, म्हणजेच ‘whole meal’ म्हणता येईल. आरोग्याच्या दृष्टीनेही या पदार्थाचे सेवन उत्तम मानले गेले आहे. त्यामुळे ऋतू कोणताही असो, खिचडी हा सर्वसामान्यपणे भारतामध्ये सर्वत्र आढळणारा पदार्थ आहे.
khichadi1
बंगालमध्ये ही खिचडी ‘खिचुरी’च्या रूपात आपल्या भेटीला येते, तर कर्नाटकामध्ये ‘बिसिबेले भात’ असे तिचे आणखी एक रूप पहावयास मिळते. तामिळनाडू मध्ये ही खिचडी ‘पोंगल’ या नावाने आढळते, तर अगदी ब्रिटनमध्ये देखील आपली साधी देशी खिचडी, ‘केजरी’ या नावाचा पाश्चात्य साज लेऊन येते. भारताच्या खाद्यसंस्कृतीच्या इतिहासामध्ये अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेल्या या पदार्थाचे रूप मात्र, आजच्या काळामध्ये देखील फारसे बदललेले आढळत नाही.
khichadi2
‘खिचडी’ हा शब्द संस्कृत शब्द ‘खिचा’ वरून घेतलेला असून, डाळ आणि तांदुळापासून तयार होणारा पदार्थ असा त्याचा अर्थ आहे. वेदिक वान्ग्मयामध्ये देखील या पदार्थाचा उल्लेख ‘कृसरान्न’ या नावाने आढळतो. हा पदार्थ बनविताना त्यामध्ये दुध, दही आणि तीळही घातले जात असत. हा पदार्थ प्राचीन काळीही नेहमी बनविला जात असल्याचा पुरावा पुरातत्ववेत्त्यांना आढळला आहे. पुण्याजवळ ‘तेर’ या ठिकाणी उत्खननाचे काम सुरु असताना २०१५ साली दोन मोठे मातीचे हंडे सापडले असून, त्यामध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ एकत्रितपणे शिजविली गेले असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे हंडे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे असावेत असा अंदाज पुरातत्ववेत्त्यांनी व्यक्त केला आहे.
khichadi3
त्यानंतर अनेक शतकांच्या कालावधीनंतर, मुघल शासनकर्त्यांनी खिचडीला राजेशाही रूपामध्ये आणले. तत्कालीन शाही मेजवान्यांमध्ये हा पदार्थ रूढ झाला. शहजादा सलीम जेव्हा गुजरातेची मोहीम फत्ते करून परतला, तेव्हा त्यानिमित्त अकबराने आयोजित केलेल्या मेजवानीमध्ये खिचडी हा पदार्थ देखील असल्याचे इतिहासकार आशुतोष पंत म्हणतात. मात्र शाही मुदपाकखान्यामध्ये हा पदार्थ खिचडी या नावाने ओळखला न जाता, ‘लझिझान’ या नावाने ओळखला जात असे. एकोणिसाव्या शतकामध्ये लखनऊच्या नवाबांचे खानसामा पिस्त्यांचा वापर करून खिचडी तयार करीत असल्याचे उल्लेख आहेत. पिस्त्यांना, तांदुळाच्या आणि डाळीच्या दाण्यांसारखा आकार देऊन ही खिचडी तयार केली जात असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment