सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांना आज संबोधित करणार पंतप्रधान


नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी आज कोरोना काळातील केलेल्या उपाययोजना, लसीकरण आणि नागरिकांचे आरोग्य या विषयावर नीती आयोगाची बैठक घेणार आहेत. नीती आयोगाची ही सहावी बैठक असेल. आजची बैठक कोरोना काळातील आव्हाने आणि सरकारच्या उपाययोजना या पार्श्वभूमीवर महत्वाची असेल.

कोरोनाच्या लसीकरणासोबत अर्थव्यवस्था आणि कामगार कायद्यातील सुधारणांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. नीती आयोगाचे सर्व सदस्य यामध्ये सामील होणार आहेत. या बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे उपस्थित राहतील का नाही याची शंका आहे.

या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार आहेत. बिहारच्या संबंधी काही महत्वाचे विषय ते नीती आयोगाच्या बैठकीत मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सहावी बैठक असेल. योजना आयोग बंद केल्यानंतर नीती आयोगाची स्थापना करण्यात आली होता. 8 फेब्रुवारी 2015 साली नीती आयोगाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीच्या अजेंड्यावर कृषी, पायाभूत सुविधा, मानव संसाधन विकास, मूलभूत सुविधा आणि आरोग्य हे विषय असतील असे सांगण्यात येते. सर्व केंद्रीय मंत्री, नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य, नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्य आणि सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित असतील. गेल्या वर्षी नीती आयोगाची कोरोनाचा संक्रमणामुळे बैठक आयोजित करण्यात आली नव्हती.