मुंबई महानगरपालिकेच्या हॉटेल, पब, रेस्टॉरंट, मंगलकार्यालयांना नोटीसा


मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने मुंबई महानगरपालिका सतर्क झाली आहे. महानगरपालिकेने शहरातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली असून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, पब, रेस्टॉरन्ट आणि मंगलकार्यालयांना महापालिकांना नोटीसा बजावल्या आहेत.

महानगरपालिका मुंबईतील कोरोनाची वाढती संख्या पहाता अॅक्शन मोडवर आहे. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने अंधेरी पश्चिमेतील 32 हॉटेल, पब, रेस्टॉरंट आणि मंगलकार्यालयाना नोटीसा बजावल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळणे सर्वांसाठी बंधनकारक असून या नियमांचे काटेकोरपणे पालन करा. तसेच होणारी गर्दी टाळा, अशा सूचना महानगरपालिकेने या हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि मंगलकार्यालयांना नोटीशीत केल्या आहेत.

या रेस्टॉरंट, हॉटेल, पब आणि मंगलकार्यालयांना महानगरपालिकेने सज्जड दम दिला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच आस्थापन सील करण्यात येईल, असा इशाराही महानगरपालिकेने दिला आहे.