बिग बींची भूमिका असलेल्या झुंडला विरोध करणार नाना पटोले !


भंडारा : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाचा नाना पटोले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा पटोले यांनी दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच आता 18 जून रोजी नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि बिग बी अमिताभ बच्चन अभिनीत झुंड चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा काल झाल्यामुळे आता नागपूर म्हणजेच विदर्भातील कथानकावर आधारित नागराज मंजुळेंच्या या चित्रपटाला नाना पटोले विरोध करणार का? याकडे लक्ष लागून आहे.

नुकतीच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘झुंड’ चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 18 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. चित्रपटाची उत्सुकता टीझरने शिगेला पोहोचवली आणि अखेर आता हा चित्रपट यंदाच्याच वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे आणि बिग बींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार यंदाच्याच वर्षी 18 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबद्दल माहिती देताना लिहिले, आपल्याला कोरोनाने अनेक झटके देत मागे आणले. पण आता दमदार पुनरागमनाची वेळ आली आहे. अखेर त्या दिवसांमध्ये आपण परतलो आहोत…..’. नागपूरच्या विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपली अशी फुटबॉल संघ बनवला होता. याच एकंदर कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट साकारण्यात आला आहे.

नाना पटोले झुंडच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर म्हणाले की, चित्रपटाला आम्ही लोकशाही पद्धतीने विरोध करणार आहोत. जिथे यांचे चित्रपट प्रदर्शित होतील, तिथे आम्ही काळे झेंडे दाखवून लोकशाही पध्दतीने विरोध करू. आमचे लोक अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट पाहणार नाहीत. आम्ही यांना जिथे मिळेल तिथे काळे झेंडे दाखवून आणि लोकशाही पद्धतीने करू. आम्ही कुठलेही थिएटर बंद पडणार नाही आणि कुठे यांचे शूटिंग बंद पडणार नाही. पण त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर मांडण्याचे भूमिका आमची राहणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.