रोचक कहाणी ‘सिल्व्हर टिप्स इम्पिरियल’ चहाची

tea
हिमालयामध्ये असलेले कांचनजंगा हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. याच शिखराच्या छत्रछायेखाली अनेक सुंदर पर्वत आहेत. समुद्रसपाटीपासून २२०० मीटर उंचीवर असलेल्या या पर्वतेराजीमध्ये दार्जीलिंग वसलेले आहे. या ठिकाणचे निसर्गसौंदर्य नजर ठरणार नाही इतके अलौकिक आहे. या पर्वतराजीमध्ये दूरवर पसरलेल्या घनदाट अरण्यामध्ये वाघ आणि हत्ती देखील दृष्टीस पडत असतात. दार्जीलिंग केवळ निसर्गसौंदर्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर या ठिकाणची जगभरामध्ये ओळख आहे, ती येथे असलेल्या चहाच्या बागांमुळे. दार्जीलिंग येथे होणारा चहा जगभरामध्ये निर्यात केला जातो. म्हणूनच दार्जीलिंगला ‘टी कॅपिटल’ म्हणूनही ओळखले जाते.
tea1
दार्जीलिंग या ठिकाणी चहाच्या ८७ विशाल बागा आहेत. यातील प्रत्येक बागेमध्ये निराळी चव, निराळा सुवास असणारी चहाची व्हरायटी पहावयास मिळते. म्हणूनच दार्जीलिंग येथे होणाऱ्या चहाला जगभरामध्ये मोठी मागणी आहे. दार्जीलिंग पासून ३३ किलोमीटर दक्षिणेकडे दार्जीलिंग येथील सर्वात जुना चहाचा कारखाना आहे. या ठिकाणी अतिशय दुर्मिळ अशी चहाची व्हरायटी आपल्याला पाहता येईल. या चहाला ‘सिल्व्हर टिप्स इम्पिरियल’ या नावाने ओळखले जाते. हा चहा जितका खास आहे, तितकेच या चहाची पाने तोडणारे ही खास आहेत. या चहाची पाने तोडण्याची मुभा इतरांना नाही. ‘मकाईबाडी’ येथील चहाच्या बागांमध्ये काम करणारे कामगारच केवळ या चहाची पाने तोडू शकतात. या चहाची आणखी एक खासियत अशी, की या चहाची पाने केवळ पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशामध्येच तोडण्यात येतात.
tea2
या चहाची पाने पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामध्येच का तोडली जावीत यामागे नेमके रहस्य काय आहे हे सांगणे कठीण असले तरी चहाची ही व्हरायटी जगामध्ये सर्वात महाग व्हरायटींपैकी एक आहे हे मात्र नक्की. २०१४ साली ‘सिल्व्हर टिप्स इम्पिरियल’ चहाची प्रती किलोमागे किंमत तब्बल १,३६,००० रुपये इतकी होती. भारतामध्ये होत असणाऱ्या या चहाला, ही मिळालेली विक्रमी किंमत आहे.
tea3
या चहाच्या पानांची तोडणी वर्षामध्ये केवळ तीन ते चार वेळच केली जाते. पौर्णिमेच्या रात्री हाती मशाल घेऊन मकाईबाडी चहाच्या बागेतील कामगार या चहाच्या काळ्या तोडतात. या चहाची चव अवर्णनीय असल्याचे स्थानिक लोक सांगतात. पौर्णिमेच्या रात्री सुंदर गीतांच्या ठेक्यावर चहा तोडण्याचे काम हे कामगार करीत असतात. चहाची पाने रात्रीच्या अंधारामध्ये तोडून, पहाट होण्याच्या आतच या चहाचे पॅकिंग करण्यात येते. सूर्याची किरणे या चहावर पडली, तर या चहाची रंगत आणि चव कमी होत असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. दर वर्षी केवळ पन्नास ते शंभर किलो इतकेच उत्पादन या चहाचे होत असते. त्यामुळे हा चहा अतिशय दुर्मिळही आहे. हा चहा जास्त करून अमेरिका, जपान, आणि ब्रिटन या देशांमध्ये निर्यात केला जातो. ब्रिटनचा शाही परिवार देखील या चहाचा शौकीन असल्याचे समजते.

Leave a Comment