नरेंद्र मोदींनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले; चंद्रकांत पाटील


पुणे – आपल्या एका वक्तव्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राष्ट्रपती केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी हे अजब पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या युवा मोर्चाच्या वॉरिअर्स कार्यक्रमात वक्तव्य केले. सर्व मुस्लिमांना नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले. एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांनी राष्ट्रपती केले. ते काय मुस्लीम होते म्हणून त्यांना बाजूला ठेवले नाही. एक कर्तुत्ववान म्हणून, एक संशोधक म्हणून त्यांना राष्ट्रपती केल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम महिलांच्या पायात बेड्या होत्या. त्या तोडण्यासाठी तिहेरी तलाकचा कायदा केला. जो विजय बिहारमध्ये निवडणुकांत मिळाला त्याचे विश्लेषण करा. मुस्लीम महिलांनी रांगेने मोदींना मतदान केले. आमच्या पायातील बेडी तुम्ही तोडली. नाही तर आमचा पती तलाक म्हणून आम्हाला बाहेर काढायचा. तुम्ही कायदा केला, असे तेथील महिला म्हणत होत्या. बिहारमध्ये मुस्लीम बहुल भागात २९ पैकी १४ जागांवर भाजपला विजय मिळाला. तर मुस्लीम महिलांनीही आपल्या पतीला सांगितले, तुम्हाला जे काही करायचे ते करा आम्ही मोदींनाच मतदान करणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी यांसारख्या महापुरुषांचं कर्तुत्व समजून घेण्याची गरज आहे. समाजात असलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी काय केले पाहिजे याचा तरुणांनी विचार केला पाहिजे. तरूणांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होते. तसेच योगदान आजही युवकांनी द्यावे. या पिढीला खरा इतिहास सांगण्याचे तसेच इतिहास, राष्ट्र आणि संस्कृतीशी जोडण्याचे काम युवा मोर्चा करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.