मुंबईमध्ये लोकलने प्रवास करताना माणसांच्या गर्दीने भरून वाहणाऱ्या अनेक रेल्वे स्थानकांचे दर्शन घडते. यातील काही रेल्वेस्थानकांना त्यांची नावे कशी मिळाली याचा इतिहास मोठा रोचक आहे. मुंबईतील सर्वात व्यस्त स्थानक म्हणजे चर्चगेट. या ठिकाणी अस्तिवात असलेले एक भव्य प्रवेशद्वार १८६० च्या दशकामध्ये नष्ट करण्यात आले. हे नष्ट झालेले गेट किंवा प्रवेशद्वार सेंट थॉमस चर्चमध्ये प्रवेश करण्यासाठी बनविल्या गेलेल्या तीन प्रवेशद्वारांपैकी एक होते. त्यामुळे या प्रवेशद्वाराचे नाव चर्चगेट पडले. सध्या मुंबईचे प्रसिद्ध फ्लोरा फाऊंटन ज्या ठिकाणी उभे आहे, त्या ठिकाणी हे प्रवेशद्वार एके काळी मोठ्या डौलाने उभे असे. सोळाव्या शतकामध्ये मुंबईची हद्द या प्रवेशद्वारापाशी संपत असे.
मुंबईच्या चर्नी रोड या स्थानकाला त्याचे नाव कसे मिळाले याचा इतिहासही रोचक आहे. ‘चर्नी’ किंवा ‘चेड्नी’ हे नाव ठाणे भागातून तेथील रहिवाश्यांच्या सोबतच मुंबईमध्ये आले. या ठिकाणी रहात असलेले अनेक रहिवासी मुंबईतील गिरगाव भागामध्ये स्थानांतरीत झाल्यानंतर, त्यांच्या जुन्या निवासस्थानाच्या नावावरून येथील रेल्वेस्थानकाला हे नाव दिले असल्याचे म्हटले जाते. ठाणे रेल्वे स्थानकाच्या जवळील वसाहतीला चर्नी या नावाने ओळखले जात असे. येथील रहिवासी स्थलांतरित झाल्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या वसाहतीला चर्नी रोड नाव पडल्याची आख्यायिका आहे.
‘माटुंगा’ या मुंबईतील उपनगराचे नाव मराठी शब्द ‘मातंग’, म्हणजेच हत्ती, या शब्दावरून पडले आहे. बाराव्या शतकामध्ये या ठिकाणी राजा भीमदेव यांच्या सैन्याचा तळ असून, त्या सैन्यामध्ये हत्तींचा देखील समावेश होता. त्यानंतर ब्रिटीश राजवटीमध्ये या ठिकाणी ब्रिटीश सैन्याची ‘आर्टिलरी’ तैनात असे. १८३५ साली ब्रिटीश सैन्याने आपला तळ येथून हलविल्यानंतर मात्र हे ठिकाण काहीसे ओस पडून होते. त्यांनतर येथे केवळ लहान लहान वसाहती तेवढ्या शिल्लक राहिल्या. त्याचप्रमाणे गोरेगाव या उपनगराला त्याहे नाव कसे मिळाले याबद्दल निरनिराळी मते पहावयास मिळतात. काहींच्या म्हणण्यानुसार गोरे नामक राजकीय नेत्याच्या परीवारावरून या उपनगराला गोरेगाव म्हटले जाऊ लागले, तर काहींच्या मते, गोरे, म्हणजे पांढरे या अर्थी या गावाचे नाव असून, या ठिकाणी दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणवर होत असल्याने या उपनगराला हे नाव पडले असल्याचे म्हटले जाते.