दिशाच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट; मानवाधिकार लोकशाहीचे अंग असायला हवे


नवी दिल्ली – टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवीच्या अटकेवर आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने प्रथमच भाष्य केले आहे. दिल्ली पोलिसांनी ग्रेटाने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणात दिशाला अटक केली होती. टूलकिटमध्ये बदल करून ती पुढे पाठवल्याचा आरोप दिशावर असून, सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. ग्रेटाने दिशाच्या अटकेवरून लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करत टीका केली.

दिल्ली पोलिसांनी रविवारी बंगळुरूतील दिशा रवी या कार्यकर्तीला तिच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर तिला दिल्लीतील पटियाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दिशाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, दिशाच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गने पहिल्यांदाच ट्विट केले आहे.


अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एकत्र येऊन शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार हा वादातीत मानवाधिकार असून कोणत्याही लोकशाहीचा हे मूलभूत अंग असायलाच हवेत,, असे ट्विट करून ग्रेटाने म्हटले आहे.

काही माध्यमांनी दिशा रवी हिच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या एफआयआरच्या तपासाबाबत दिलेले वृत्त सनसनाटी निर्माण करणारे आणि पूर्वग्रहदूषित असल्याचे सूचित होत असल्याचे मत व्यक्त करत दिशाची दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तिची याआधी पाच दिवस पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. पोलिसांनी ती मुदत संपल्यानंतर तिला न्यायालयासमोर हजर केले, तेव्हा अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी तिची तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.