विदर्भात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव नाही; आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण


पुणे : राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली असून कोरोना रुग्णांची संख्या ज्या प्रकारे वाढत आहे. त्यामुळे लवकरच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचे लसीकरण जगात काही देशांमध्ये सुरु झाले आहे, तर दुसरीकडे आता कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून येत आहेत. अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मागील काही आठवड्यांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

आरोग्य विभागाकडून या वाढीची कारणे शोधण्याचा प्रयत्न झाला. पण या रुग्णवाढीला विषाणूचा नवा प्रकार कारणीभूत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन अमरावती, यवतमाळमध्ये आढळलेला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभागाकडून अमरावती, अकोला, सातारा, पुणे या जिल्ह्यांतील कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का? या संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुन्यांची पुण्याच्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासणी केली.

या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नसल्यामुळे सध्या तरी हा कुठलाही परदेशी कोरोना स्ट्रेन नाही हे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील 12 नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत.