चेन्नई – 18 फेब्रुवारीला चेन्नईत आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीचा लिलाव पार पडला. या लिलावात एकूण 298 खेळाडूंपैकी 57 खेळाडूंना 8 फ्रँचायजींनी विकत घेतले. दरम्यान या लिलावातून सनरायजर्स हैदराबादने सर्वात कमी म्हणजेच 3 खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील केले आहे. यामध्ये केदार जाधव, मुजीब उर रेहमान आणि जगदीश सुचिथ यांचा समावेश आहे.
ठरलं! आता हैदराबादकडून खेळणार मराठमोळा केदार जाधव
केदार जाधवला त्याच्या बेस प्राईज अर्थात 2 कोटींमध्ये हैदराबादने खरेदी केले. चेन्नई सुपर किंग्जसने केदारला करारमुक्त केले होते. 13 व्या मोसमात केदारने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे चेन्नईने करारमुक्त केले. तसेच केदार व्यतिरिक्त हैदराबादने मुजीब उर रहमानला 1. 50 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतले. तर जगदीशा सुचितसाठी हैदराबादने 30 लाख मोजले.
आतापर्यंत एकदाच आयपीएलचे विजेतेपद हैदराबादला पटकावण्यात यश आले होते. 2016 मध्ये ही कामगिरी हैदराबादने केली होती. गेल्या मोसमात हैदराबादने टॉप 3 मध्ये एंट्री मारली होती. पण क्वालिफायर 2 सामन्यात दिल्लीकडून पराभव झाल्याने हैदराबादचा प्रवास तिसऱ्या क्रमांकावर संपला होता. गेल्या मोसमात हैदराबादने एकूण साखळी फेरीतील 14 सामन्यांमधून 7 सामन्यात विजय मिळवला होता.
कॅप्टन डेव्हिड वॉर्नरचा अपवाद वगळला तर हैदराबादकडे दिग्गज फलंदाज नाहीत. याचाच फटका हैदराबादला बसला होता. दरम्यान या मोसमात केदार जाधव संघासोबत जोडला गेल्य़ामुळे केदार या मोसमात हैदराबादसाठी काय कामगिरी करतो, याकडे सर्व महाराष्ट्राचे आणि हैदराबादचे लक्ष असणार आहे.
गेल्या वर्षी थंगारासून नटराजन अनकॅप्ड खेळाडू होता. एलिमिनेटर सामन्यात त्याने बंगळुरुच्या एबी डी व्हीलियर्सला यॉर्कर चेंडूवर बोल्ड केले होते. त्याने यासह संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. नटराजन तेव्हापासून यॉर्कर किंग म्हणून उदयास आला. या 13 व्या मोसमात तो सर्वाधिक यॉर्कर टाकणारा गोलंदाज ठरला. त्यानंतर नटराजनने ऑस्ट्रेलियाविरोधातील तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण केल्यामुळे या मोसमात नटराजन कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.