नाना पटोलेंचे फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर


मुंबई – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना “सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतुन माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली असल्याचे म्हटले आहे.

अमिताभ बच्चन व अक्षयकुमार यांच्यावर पटोले यांनी इंधन दरवाढीवरून निशाणा साधल्यानंतर त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर आता नाना पटोले यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिले आहे. तसेच यावेळी, एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर टीव-टीव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का?… ही जनतेच्या मनातील भावना मी व्यक्त केली, तर भाजप नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?” असा प्रश्न देखील पटोलेंनी विचारला आहे.


दरम्यान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग बंद पाडण्याच्या नाना पटोलेंनी दिलेल्या इशाऱ्याला देवेंद्र फडणवीसांनी पब्लिसिटी स्टंट म्हटले होते. नाना पटोलेंचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यांना माहित आहे की अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर काही बोलले, तर पब्लिसिटी मिळते. यात त्यांचेच भले आहे. नवेनवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनाही त्यांचे नाव कमवायचे असल्यामुळे त्यांना वाटते की दिवसभर पब्लिसिटी मिळते. शूटिंग कसे आणि कोण बंद करू शकते? येथे कायद्याचे राज्य आहे. तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही मालक झाले आहात, असे फडणवीस म्हणाले होते.