देशातील या गावात मृतदेहाची जात पाहून मग त्यावर केले जातात अंत्यसंस्कार


बुलंदशहर : जातीच्या आधारावर विभागल्या गेलेल्या अनेक वस्त्या देशातील अनेक राज्यांत, खेड्यापाड्यांत सहज नजरेस पडतात. पण उत्तर प्रदेशमध्ये जातीपातीच्या आधारावर स्मशानभूमीचेही विभाजन करण्यात आल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. उल्लेखनीय म्हणजे, या गावाचे आणि स्मशानभूमीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर प्रशासनही हडबडून जागे झाले आहे.

देशातील सर्व नागरिक देशाच्या संविधानासाठी एकसमान असले तरी देशात आजही अनेक असे प्रांत आहेत, ज्याठिकाणी धार्मिक किंवा जातीय भेदभावाचे भयंकर वास्तव डोळ्यांसमोर येते. अशीच एक घटना बुलंदशहरच्या पहासू ब्लॉकच्या बनैल गावातूनही समोर आली आहे. दलित, दलितेतर असे विभाजन येथील स्मशानभूमीचेही करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ साली या गावात स्मशानभूमी निर्माण करण्यात आली होती. या स्मशानभूमीचे काही काळानंतर दोन भागांत विभाजन करण्यात आले. हे गाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) माजी सरसंघचालक राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैय्या यांचे मूळ गाव म्हणून ओळखले जाते. दलित, दलितेतर अशी विभागणी करण्यासाठी स्मशानभूमीत ताराही पसरवण्यात आल्या आहेत. तारेच्या एका बाजुला दलितांसाठी जागा देण्यात आली आहे, तर तारेच्या दुसऱ्या बाजुला इतर जातीच्या गावकऱ्यांच्या अंत्यविधीसाठी जागा देण्यात आली आहे.

असा भेदभाव करणे गावातील काही रहिवाशांना मंजूर नाही. परंतु, या तारा जेव्हा पसरवण्यात आल्या तेव्हा मात्र याला कुणीही विरोध केला नव्हता. पहासूच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, हा प्रकार त्यांच्यादेखील आत्ताच नजरेस आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.