टूलकिट प्रकरणात दिशा रवीची ३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी


नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी देशात सध्या गाजत असलेल्या कथित टूलकिट प्रकरणात अटक केलेल्या दिशा रवीची पतियाला न्यायालयाने आज ३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. न्यायालयाने याआधी दिशाला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दिल्ली पोलिसांनी कोठडीची मुदत संपताच ३ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. पण, दिशाला ३ दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. शुक्रवारी दिशा रवीला दिल्ली पोलिसांनी पतियाला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने यावेळी पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली.

१५ फेब्रुवारी रोजी दिशा रवीला दिल्ली पोलिसांनी तिच्या बंगळुरूतील राहत्या घरातून अटक केली होती. दिशा रवीने ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला समर्थन देताना ट्वीट केलेल्या टूलकिटचा एक भाग संपादित केल्यामुळे देशविरोधी कटकारस्थान रचल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, दिशाने आपण फक्त शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते केल्याचे म्हटले असले, तरी तिच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिशाला सुरुवातीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या ५ दिवसांमध्ये पोलिसांनी दिशाची कसून चौकशी केली.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी न्यायालयासमोर दिशाची पोलीस कोठडी वाढवून मागताना ती चौकशीदरम्यान इतर आरोपींना दोष देत असल्यामुळे तिची शंतनु मुळूकसोबत समोरासमोर चौकशी करण्याची गरज आहे. २२ फेब्रुवारी रोजी त्याची चौकशी होणार असून तोपर्यंत दिशाला पोलीस कोठडीतच ठेवण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.