नवी दिल्ली – देशात टूलकिट प्रकरणावरून सुरू असलेल्या चर्चेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. २२ वर्षांच्या दिशा रवीला या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांना त्यावरून लक्ष्य केले जात होते. अमित शाहांनी त्याविषयी बोलताना दिल्ली पोलिसांची पाठराखण केली आहे. या प्रकरणाचा दिल्ली पोलीस योग्य पद्धतीने तपास करत आहेत. गुन्हा किंवा गुन्हेगार ठरवण्यामध्ये संबंधित व्यक्तीचे वय, लिंग किंवा व्यवसाय महत्त्वाचा कसा ठरू शकतो? गुन्ह्याचे स्वरूप या घटकांवरून कसे ठरवता येईल?’ असा सवाल अमित शाहांनी उपस्थित केला आहे. दिशा रवीच्या वयामुळे दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर टीका केली जात आहे.
दिशा रवीच्या अटक प्रकरणी अमित शहांकडून दिल्ली पोलिसांची पाठराखण
गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकारण शेतकरी आंदोलनाच्या आडून कट-कारस्थान करण्यासाठीच्या कथित टूलकिट प्रकरणावरून ढवळून निघाले आहे. हे टूलकिट ट्विट स्वीडीश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने केल्यानंतर हा वाद सुरू झाला. २६ जानेवारीला राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारासाठीची हे टूलकिट पूर्वतयारी होती या संशयावरून ग्रेटा थनबर्ग, दिशा रवी, शंतनु मुळूक, निकिता जेकब हे आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत.
त्यांनी यावेळी माध्यमांवर देखील टीका केली. हा कसला ट्रेंड आहे, जिथे एखाद्या गुन्ह्याबद्दल बोलताना लोक संबंधित व्यक्तीचे वय, व्यवसाय किंवा लिंगाविषयी बोलत आहेत? असे अनेक २२ वर्षीय लोक आत्तापर्यंत अटकेत असतील. दिल्ली पोलिसांनी काही पुराव्यांच्या आधारावरच अटक केली असेल, असे ते म्हणाले.
दिशा रवीला तिच्या बंगळुरूमधील राहत्या घरातून १५ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या टूलकिटचा काही भाग संपादित केल्याचा आरोप तिच्यावर आहे. गुन्हेगारी कारस्थान आणि देशद्रोहाचा गुन्हा यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी दाखल केला आहे. दिशाची ५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला पुन्हा ३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.