कर्जात बुडालेली ‘ही’ बडी कंपनी खरेदी करत आहेत अंबानींचे व्याही


नवी दिल्ली – 37,250 कोटी रुपयांत DHFL (Dewan Housing Finance Corporation)च्या अधिग्रहणासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने पिरामल ग्रुपला मंजुरी दिली आहे. DHFL च्या कर्जदात्यांच्या समितीकडूनही (COC) या डीलला आधीच मंजुरी मिळाली आहे. गेल्या महिन्यातच सीओसीने पिरामल ग्रुपची कंपनी पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या समाधान योजनेला मंजुरी दिली होती.

देशातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पिरामल ग्रुपचे प्रमुख अजय पिरामल हे व्याही आहेत. पिरामल ग्रुपचा फायनांशिअल सर्व्हिसेस आणि फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये व्यवसाय आहे. याशिवाय ते रिअल इस्टेटमध्येही आहेत. त्यांचा मुलगा आनंद पिरामल यांचा विवाह मुकेश अंबानी यांची एकुलती एक कन्या ईशा अंबानी सोबत झाला आहे.

एका निवेदनात पिरामल ग्रुपने म्हटले आहे, ‘आरबीआयने पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्सच्या DHFL समाधान योजनेला मंजुरी दिली आहे. DHFLने गेल्या आठवड्यातच डिसेंबर 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीदरम्यान 13,095.38 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा झाल्याचे म्हटले होते.

जुलै 2019 मध्ये DHFL वर बँकांचे तब्बल 83,873 कोटी रुपयांचे कर्ज होते. यात सर्वाधिक 10,083 कोटी रुपयांचे कर्ज भारतीय स्टेट बँकेचे आहे. मार्च 2020 मध्ये कंपनीची मालमत्ता 79,800 कोटी रुपये एवढी होती. यांपैकी 63 टक्के एनपीए झाली होती.

या शर्यतीत अमेरिकन अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी Oaktree नेही भाग घेतला होता. यात 45 टक्के मते Oaktree ला मिळाली. याच वेळी या शर्यतीत सहभागी असलेल्या अदानी कॅपिटल या दुसर्‍या कंपनीला केवळ 18 टक्के मते मिळाली. Oaktree यांनी डीएचएफएलसाठी 38,400 कोटी रुपयांची बोली लावली होती, तर 37,250 कोटींची बोली पिरामलने लावली होती. मात्र, पिरामलच्या ऑफरमध्ये अग्रीम रोख रकमेचा वाटा अधिक होता आणि म्हणून या गटाने हा लिलाव जिंकला.