चीनची कबुली; चार चिनी सैनिकांचा गलवान व्हॅलीतील संघर्षात मृत्यू


बीजिंग – २० भारतीय जवान पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षात शहीद झाले होते. तर चिनी सैनिकही या घटनेत मरण पावल्याचे सांगितले जात होते. पण त्याबद्दल चीनने अळीमिळी गुप्पचिळी धरली होती. अखेर चीनने पँगाँग सरोवर परिसरातून सैन्य मागे घेतल्यानंतर गलवान व्हॅलीतील संघर्षाबद्दल मौन सोडल असून, चिनी सैनिकही त्या घटनेत मारले गेल्याचे अधिकृतरित्या मान्य केले आहे. पीएलएच्या अधिकाऱ्यांसह चार सैनिक गलवानमध्ये मारले गेले होते. चीनने या चार सैनिकांना मरणोत्तर पदक दैऊन गौरवल्यामुळे ही माहिती समोर आली आहे.

कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच भारत व चिनी सैन्यामध्ये पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत रक्तरंजित संघर्ष उफाळून आला होता. हा लष्करी संघर्ष १५ जून २०२० रोजी मध्यरात्री झाला होता. भारताचे २० जवान या घटनेत शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्याचबरोबर गलवान व्हॅलीतील संघर्षामुळे भारत-चीन सीमेवर युद्धसदृश्य स्थितीही निर्माण झाली होती.

भारताचे २० जवान या घटनेत शहीद झाले होते. त्याचबरोबर चिनी लष्कराचेही सैनिक मारले गेल्याचे वृत्त होते, पण चीनने आपले सैनिक मारले गेल्याची वाच्यता केली नव्हती. अखेर त्यावरील पडदा दूर झाला आहे. यासंदर्भात ‘पीपल्स डेली’ने दिलेल्या माहितीनुसार चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाने काराकोरम पर्वतावर कर्तव्यावर असलेल्या आणि जूनमध्ये शहीद झालेल्या चार सैनिकांचा गौरव केला आहे. या चार सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे ‘ग्लोबल टाइम्स’च्या वृत्तानुसार पाच सैनिकांचा मृत्यू गलवान व्हॅलीत झाल्याचे समोर आले आहे. कमांडर क्यूई फबाओ, चेन होंगुन, जियानगॉन्ग, जिओ सियुआन आणि वाँग जुओरन अशी या जवानांची नावे आहेत. यातील चौघांचा मृत्यू गलवान व्हॅलीतील संघर्षात झाला होता. तर एकाचा मृत्यू मदत मोहिमेदरम्यान नदीत वाहून गेल्यानं झाला होता.