इंधन दरवाढीवरुन उर्मिला मातोंडकरांनी साधला मोदी सरकारवर निशाणा


मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरुन अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोलचे दर देशाच्या काही भागांमध्ये प्रतिलिटर १०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या या वाढत्या किंमतींचा फटका बसत असल्यामुळे उर्मिला यांनी एका जुन्या गाण्याचा आधार घेऊन मोदी सरकारवर उपरोधिक पद्धतीने टिका केली आहे.


राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये गुरुवारी प्रतिलिटर पेट्रोलचा दर १०० च्या पुढे गेला असून इंधनाच्या किंमती सलग दहाव्यादिवशी वाढल्या आहेत. लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या अक्कड़ बक्कड़ बंबे बो या गाण्याच्या ओळीपकडून पेट्रोल, सिलेंडरचा संदर्भ देऊन उर्मिला मातोंडकर यांनी उपरोधिक टीका केली आहे.

पेट्रोलवर गुरुवारी प्रतिलिटर ३४ पैसे तर डिझेलच्या दरात ३२ पैशांची वाढ झाली. पेट्रोलवर विविध कर असल्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात प्रतिलिटर पेट्रोलचे दर १०० च्या पुढे गेले. मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर ९६.३२ पैसे तर डिझेलचा दर ८७.३२ पैसे आहे.