पूजा चव्हाणच्या वडिलांचा गौप्यस्फोट; तिच्या डोक्यावरील वाढले होते कर्ज


पुणे – राज्यात सध्या पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजप संजय राठोड यांच्या राजीनाम्याची एकीकडे मागणी करत असताना महाविकास आघाडी सरकारने दुसरीकडे जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे. पूजा चव्हाणचा मुद्दा भाजप आक्रमकतेने मांडत असताना तिच्या वडिलांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. तीन वर्ष पुजा भाजपची कार्यकर्ता होती, असा गौप्यस्फोट एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केला आहे.

खूप ताण पूजावर होता. तिच्या डोक्यावरील कर्ज वाढले होते. तिने पोल्ट्री फार्मसाठी कर्ज घेतले होते, तिचे यामध्ये खूप मोठे नुकसान झाले होते. यामध्ये काही होणार नाही म्हणून आपण पुण्याला जाऊन दुसरे काही तरी करते, असे ती म्हणाल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे.

माझे तिच्याशी आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी २ वाजता बोलणे झाले होते. मी तिला पैसे वैगेरे हवे का असे विचारले होते, त्यावर ती नको म्हणाल्याचे त्यांनी सांगितले आहे. पूजा प्रकरणात अनेक नावंे येत असून त्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, हे सगळे चुकीचे आहे. कोणी कोणाचे नाव जोडून काहीतरी सांगत आहे. हे सगळे थांबले पाहिजे. पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटते. बदनामी थांबवा असे आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु असून हे कुठे तरी थांबले पाहिजे. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडणेही चुकीचे असून, त्याचा काहीच संबंध नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान या प्रकरणी एका मंत्र्यांचे नाव जोडले जात असल्याचा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, मंत्री असो की कोणीही असो तपासाअंती नाव आले, तर कारवाई होईलच. पण सध्यातरी कोणाचे नाव घेऊ शकत नाही. त्यांनी पुढे सांगितले की, भाजपसाठी पूजाने तीन वर्ष काम केले. तिथे तिला कोणी काही विचारत नव्हते. काय झाले नेमके मला माहिती नाही. सध्या नुसती बदनामी सुरु आहे, पण मला साधा कोणी फोनही केला नाही. तिचे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत फोटो आहेत. पण चौकशीसाठी कोणीही फोन केला नाही. फक्त बदनामी सुरु आहे. सर्वांना सत्य समोर आल्यावर बोलले पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली आहे.